१७१ वा अखंड हरिनाम सप्ताह

श्री. साई बाबा समाधी शताब्दी वर्ष २०१७-१८

icon प्रस्ताविक

दक्षिण गंगा म्हणून पवित्र मानल्या गेलेल्या गोदावरी नदीच्या कुशीत वसलेले श्री क्षेत्र सराला बेट हे महाराष्ट्राच्या धार्मिक आणि अध्यात्मिक क्षेत्रातील मानाचे पान आहे. अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवर श्रीरामपूर तालुक्यात हे बेट आहे. याच बेटावर योगीराज सद्गुरू श्री गंगागिरिजी महाराज यांनी वास्तव्य केले. सन १९१४ मध्ये देवगिरीबुवा आणि सोमवारपुरी उर्फ अन्नपूर्णामाता यांच्या पोटी कापूसवाडगाव ( जिल्हा –औरंगाबाद ) येथे गंगागिरि महाराजांचा जन्म झाला. त्यांना भगीरथी आणि विठाबाई या दोन बहिणी, दोघीही त्यांच्याहून थोरल्या. गंगागिरि अवघे दोन वर्षाचे असताना त्यांचे वडील देवगिरीबुवांचे येवला येथे अमास्मिक निधन झाले.

वयाच्या नवव्या वर्षापासून गंगागिरि त्यांच्या कुटुंबाच्या परंपरेनुसार घरोघर भिक्षा मागू लागले. सकाळी भिक्षा आणि नंतर गावाच्या जवळपास गुरे वळणे, व्यायाम करणे असा त्यांचा दिनक्रम असायचा. याच दरम्यान त्यांना शिकण्याची गोडी निर्माण झाली. ते गावठी शाळेत जाऊ लागले. अक्षरओळख होत असताना त्यांची अध्यात्मातील रुची वाढत होती. गावात रात्री पोथीवाचनाचा कार्यक्रम असायचा. गंगागिरि लवकरच धार्मिक ग्रंथ वाचू लागले आणि त्यातील ओव्यांचे निरुपणही करू लागले. त्यांच्या निरुपणाचा गोडवा असा काही होता कि त्यांना शेजारपाजारच्या गावाहूनही पोथी वाचनासाठी बोलावणे येऊ लागले.

गंगागिरि बारा वर्षाचे असताना अचानक त्यांचे मातृछत्र हरपले. दोन्ही बहिणींची लग्न झालेली, आई आणि वडील दोघांचे छत्र गेलेले अशा परिस्थितीत गंगागिरि खऱ्या अर्थाने पोरके झाले. आता कोणतेच पाश उरले नव्हते. त्यांच्या मनात विरक्तीचे विचार सुरु झाले. त्यांच्या शेजारच्या गावात रहाणाऱ्या एका विद्वान भिक्षुक व्यक्तीकडून ज्ञानार्जन करायला सुरुवात केली. दिवसेंदिवस त्यांची ज्ञानाची भूक वाढत होती. एकीकडे शिक्षण सुरु होते तर दुसरीकडे लहानपणापासून असलेली व्यायामाची आवडही कायम होती. कुमार वयातील गंगागिरि आता गावोगाव कुस्त्याही करू लागले. लोकांना रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा समजाऊन सांगता सांगता ते गावोगावच्या जत्रांमध्ये पहिलवान म्हणूनही नाव कमावू लागले.

वयाच्या अठराव्या वर्षी त्यांना समाजात एक साधुपुरुष म्हणून लोक ओळखू लागले. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांना उत्तर भारतातील एक साधुपुरुष भेटले. त्यांच्या सान्निध्यात गंगागिरिंनी अध्यात्म अधिक व्यापक स्वरुपात समजावून घेतले. त्यांच्यातील विरक्तीची भावना दिवसेंदिवस अधिक प्रबळ होत चालली होती. सन १८४० मध्ये वयाच्या २६ व्या वर्षी त्यांनी संपूर्ण विरक्ती स्वीकारली. घरातल्या भांडयाकुंड्यांसह घराचाही त्याग केला. पक्वान्न भोजन, गोड धोड पदार्थ टाळून ते फक्त भाजी भाकरी आणि कधीतरी दुध, ताक सेवन करू लागले. आणि आपले पुढील संपूर्ण आयुष्य समाजाप्रती समर्पित केले.

मानवता धर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून द्यायला सुरुवात केली. भुकेलेल्या अन्न, तहानलेल्याला पाणी दिलेच पाहिजे यावर त्यांचा कटाक्ष राहू लागला. जातीभेदाच्या भिंती पडून ते समाजातल्या सर्व लोकांना एकाच पंक्तीत बसवून जेऊ घालू लागले. व्यसनमुक्ती, स्वच्छता हाही त्यांच्या कार्यातील महत्वाचा भाग होता. १८४७ साली त्यांनी कापूसवाडगाव येथे आपला पहिला सप्ताह साजरा केला. त्यांच्या सप्ताहाचे वैशिष्ट्य म्हणजे समाजातील सर्व जातीधर्माचे, सर्व आर्थिकस्तरातले लोक एकाच पंक्तीत बसून लोकांनी गोळा केलेल्या भाकरी आणि सोबत आमटीचा प्रसाद ग्रहण करू लागले. ही प्रथा आजतागायत सुरु आहे.

गंगागिरि महाराजांनी आयुष्यभर खूप भ्रमंती केली, अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. गावोगाव हरिनाम सप्ताह केले. याकाळात खूप मोठ्या संख्येने लोक महाराजांचे अनुयायी बनले. त्यांचा भक्त परिवार दूरदूरपर्यंत विस्तारला. आता महाराजांना भेटायला येणाऱ्या भक्तगणांसाठी कुठेतरी जागेची आवश्यकता भासू लागली. त्यांना एक जागा आवडली. गोदावरीच्या पात्राने वेढलेले आणि वृक्षवेलींनी बहरलेले एक बेट त्यांच्या मनात भरले. या जागेचे मालक होते वैजापूरचे श्री बचरालशेठ संचेती. महाराजांना आपली जागा आवडली ही गोष्ट संचेतीशेठ यांना कळली, त्यांना मनापासून आनंद झाला. त्यांनी मोठ्या आनंदाने आपली बेटावरील पासष्ट एकर जागा महाराजांना दान स्वरूपात दिली.

तेव्हापासून ते आजतागायत बेटाला भेट देणाऱ्या आणि आत्मिक शांती – समाधान मिळवणाऱ्या भाविक भक्तांची संख्या सातत्याने वाढत आहे. पुढे १९ मार्च २००९ रोजी परमपूज्य नारायणगिरी महाराज वैकुंठवासी झाले. त्यांच्यानंतर गंगागिरि महाराजांच्या गादीचे उत्तराधिकारी म्हणून श्री रामगिरि महाराज हे बेटाच्या सर्व परंपरा मोठ्या श्रद्धेने पुढे नेत आहेत. पूज्य श्री रामगिरि महाराजांच्या कल्पक आणि दूरदृष्टीच्या अध्यात्मिक नेतृत्वाखाली सप्ताहाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच आहे. महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यातूनही भाविक मोठ्या संख्येने या सप्ताहाला हजेरी लावीत आहेत. एप्रिल २०१८ मध्ये शिर्डीची सप्ताह समिती व स्वतः श्री रामगिरी महाराज यांनी दिल्ली येथे जाऊन पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना सप्ताहाचे निमंत्रण दिले. यावेळी पंतप्रधानांनी महाराजांकडून या सप्ताहाच्या परंपरेबद्दल आणि वैशिष्ट्यांबद्दल मोठ्या उत्सुकतेने जाणून घेतले.

शिर्डी येथील निमगाव शिवारात १६ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट २०१८ या कालावधीत श्री गंगागिरि महाराजांच्या १७१ व्या अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री साईबाबांच्या समाधी शताब्दी वर्षाचे औचित्य साधून होत असलेला हा सप्ताह सर्वार्थाने अविस्मरणीय व्हावा यासाठी संयोजन समिती प्रयत्नशील आहे. कारण श्री साईबाबा हे महान विभूती आहेत हे लोकांना सर्वप्रथम ज्या साधुपुरुषाने सांगितले ते म्हणजे सद्गुरू श्री गंगागिरि महाराज यांनी. त्यामुळे शिर्डीच्या सप्ताहात या संतभेटीला उजाळा मिळणार आहे. आपण हा अपूर्व सोहळा याची देही याची डोळा बघण्यासाठी... अनुभवण्यासाठी जरूर यावे ही आग्रहाची विनंती.


Gangagiri Maharaj Akhanda Harinam Saptah - 2018 - Shirdi

 
गंगागिरी महाराजांच्या मुळ पादुका

Gangagiri Maharaj Akhanda Harinam Saptah - 2018 - Shirdi

 
साईबाबांच्या मुळ पादुका

icon
लेने को हरी नाम है, देने को अन्न दान |

तरने को लीनता, डूबने को अभिमान ||